उस्मानाबाद :  घर, जमीन, वाहन यांचे करार आपण पाहिले असतील पण उस्मानाबाद जिल्ह्यातील दोन गावात चक्क देवाचा करार केला जातो. अणदूर आणि नळदुर्ग या दोन गावांत चार किलोमीटर अंतर आहे. तसेच या दोन्ही ठिकाणी श्री खंडोबाचे मंदिरे आहेत पण मूर्ती मात्र एकच आहे. यामुळे या दोन गावात चक्क देवाचा करार केला जातो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्री खंडोबा देवाचे वास्तव्य वर्षातील सव्वा दहा महिने अणदूर येथे आणि पावणे दोन महिने नळदुर्ग मध्ये असते . अणदूरहुन नळदुर्गला आणि नळदुर्गहुन अणदूरला मूर्ती नेताना दोन्हीं गावातील मानकऱ्यामध्ये देवाचा लेखी करार केला जातो. महत्वाचं म्हणजे हा करार मूर्तीच्या समोर भंडारा उधळून केला जातो.



अणदूरची यात्रा रविवारी मोठया भक्तीभावाने पार पडली. यावेळी मध्यरात्री 1 वाजता दोन्ही गावाच्या मानकऱ्यात लेखी करार करून त्याचे वाचन करण्यात आले. त्यानंतर श्री खंडोबाची मूर्ती पालखीमध्ये वाजत गाजत नळदुर्गला नेण्यात आली. सोमवारी पहाटे पाच वाजता नळदुर्गच्या मंदिरात श्री खंडोबा, म्हाळसा, हेगडीप्रधान यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.